श्रीहरी अणे, ज्येष्ठ विधिज्ञ

* निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे, उद्योगधंदे बुडत असून रोजगार कमी होत चालला आहे. महाराष्ट्रातही तेच चित्र आहे. उद्योगधंद्यांमध्ये पुढारलेल्या देशातील पहिल्या क्रमांकाच्या महाराष्ट्रासारख्या राज्यातही एवढी वाईट परिस्थिती का आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. रस्ते, पायाभूत सुविधांपासून अन्य अनेक प्रश्न आहेत. विदर्भासारखा प्रदेश  गतीने प्रगती करू शकलेला नाही. तेथील समस्या कायम आहेत.

’ या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात, असे वाटते का?

अनेक प्रश्न उपस्थित होऊनही ते अनुत्तरितच आहेत. कोणते तरी फुटकळ मुद्दे उपस्थित करून किंवा भावनिक बाबींना हात घालून चर्चा केली जाते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी विरोधी पक्षही प्रमुख मुद्दय़ांवर पुरेसा भर देत नाहीत किंवा सत्ताधाऱ्यांकडून विकास, प्रगतीशी निगडित प्रश्नांची उत्तरे मागतच नाहीत. त्यासाठी आग्रही राहात नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष मूळ प्रश्नांना बगल देत उत्तरे देण्याचे टाळत आहेत. भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीची टीका केली व अनेक मान्यवर घराण्यांतील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. घराणेशाही किंवा अन्य किरकोळ बाबींवर टीकाटिप्पणी होते व त्याभोवतीच वाद फिरत राहतात.पक्षांचे जाहीरनामे व सभांमध्ये याआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, त्याबाबत जाबच विचारला जात नाही. निवडणुकीच्या काळात सरकारची धोरणे, उद्दिष्टे, केलेली व अपूर्ण कामे आदी सर्व बाबींवर मुद्दय़ाधारित सार्वजनिक चर्चा, वादविवाद होणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने ते होत नाही.

* नवमतदारांना कोणता संदेश द्याल?

दुय्यम  मुद्दय़ांकडे लक्ष न देता देशाचे व राज्याचे मूळ प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न कोण करीत आहे, त्यांच्याकडे त्यावर कोणते उत्तर किंवा उपाययोजना आहेत, याचा तरुणांनी विचार करायला हवा. नुसत्या समस्या, तक्रारी मांडून उपयोग नाही. त्यांचे समाधान कोण करू शकतो, हे पाहिले पाहिजे. राजकीय पक्ष व उमेदवार यांची ध्येय-धोरणे, विचारसरणी हे पाहूनच योग्य उमेदवारास मतदान करावे.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, असे वाटते?

धार्मिक-जातीय बाबींवर प्रचार करणे अयोग्य आहे. भावनिक किंवा धार्मिक बाबींवर मत मांडणे वज्र्य आहे, असे नाही. जातीधर्मातील चुकीच्या बाबी, पायंडे, पद्धती दूर करण्याबाबत कोणती भूमिका आहे, विचारसरणी आहे, याविषयी मते मांडण्यास हरकत नाही. एखाद्या जातीधर्मास आरक्षण, जातीय-धार्मिक भावना भडकावणे अशा बाबींवर प्रचार असू नये.

संकलन : उमाकांत देशपांडे