उद्या संध्याकाळपर्यंत कोणीच दावा केला नाही तर घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊन राज्यापालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

“राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना-भाजपा काय निर्णय घेतात त्यावर सर्व अवलंबून आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकार दिलं पाहिजे यासाठी आमची सर्वांशीच चर्चा सुरु आहे. आम्ही पाच जणांनी हायकमांडकडेही आम्ही यासंदर्भात आमचे मत मांडले आहे,” असेही यावेळी चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं हे अशोक चव्हाणांसह सर्वांच मत आहे. मात्र, आमदारांना फोडण्याच्या चर्चा आता रंगत असल्या तरी आमचे आमदार फुटणार नाहीत, असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवर चव्हाण म्हणाले, “राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत आम्ही राज्यपालांना भेटलो. या भेटीत आमच्यावतीने राज्यपालांना सरकारच्यावतीने सुत्र हातात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. काळजीवाहू सरकार यासंदर्भात काम करत नाही तसेच अजूनही नवे सरकार स्थापन होत नसल्याने आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले.”