28 May 2020

News Flash

समाजमाध्यमांवरील प्रचारात सर्वपक्षीयांचा धुमाकूळ, मतदार मात्र हैराण

सभा, बैठका, मेळावे पूर्ण होताच तत्काळ त्याची छायाचित्र दूपर्यंत पोहोचवली जात आहेत. ऑडिओ कॉलद्वारे मतदारांना साद घातली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप, कार्यकर्त्यांची तिखट शेरेबाजी

प्रसारमाध्यमांकडून मनासारखी प्रसिद्धी मिळत नसल्याने समाजमाध्यमांचा खुबीने वापर करण्याचे धोरण शहरातील प्रमुख आणि सर्वपक्षीय उमेदवारांनी ठेवल्याचे दिसून येते. उमेदवारांच्या गाठीभेटी, बैठका, दौऱ्यांची अद्ययावत माहिती देण्याच्या कामात समर्थकांमध्ये चढाओढ असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि तिखट शेरेबाजीचा मारा सुरूच आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून समाजमाध्यमांवर सुरू असलेला हा धुमाकूळ राजकीय मंडळींच्या दृष्टीने सोयीचा असला तरी मतदारांच्या दृष्टीने मात्र तो डोकेदुखीचा विषय बनला आहे.

विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार आहेत. जेमतेम सहा दिवस राहिले असल्याने अल्पावधीत अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधणे, हे सर्वपक्षीय उमेदवारांपुढे  मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. आतापर्यंत उमेदवारांकडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी वर्तमानपत्र व त्यानंतर दूरचित्रवाणीचा वापर करण्यात येत होता. मात्र, तेथील प्रसिद्धीच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आता या मंडळींनी आपला मोर्चा समाजमाध्यमांकडे वळवला आहे.

यंदाच्या निवडणुकीत त्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. उमेदवारांच्या प्रचाराचा दिनक्रम कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे, भावनिक साद घालणारी पोस्ट तथा चित्रफीत तयार करून त्याचा प्रसार करणे, विरोधकांवर टीका करणे तथा त्यांच्याकडून झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देणे, असे विविध प्रकार सध्या सुरू आहेत. अलीकडे, प्रत्येकी ३० सेकंदाचे स्टेट्स व्हिडिओ तयार करण्यात आले असून अधिकाधिक कार्यकर्ते ते वापरात आणत आहेत. मोठय़ा नेत्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण फेसबुक पेजच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गर्दीचे चित्रण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापरही केला जातो.

सभा, बैठका, मेळावे पूर्ण होताच तत्काळ त्याची छायाचित्र दूपर्यंत पोहोचवली जात आहेत. ऑडिओ कॉलद्वारे मतदारांना साद घातली जात आहे. समाजमाध्यमांचा जितका उपयोग होतो आहे. तितक्याच प्रमाणात त्याचा गैरवापरही केला जात आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अनेकांना त्याचा मनस्तापही होताना दिसतो. नको तितक्या प्रमाणात संदेश प्राप्त होत असल्याने मतदार राजा मात्र हैराण झाल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 1:54 am

Web Title: social media all political party akp 94
Next Stories
1 अकरावीचे प्रवेश संपता संपेनात..
2 शिवाजीनगरमध्ये भाजप एकसंध; काँग्रेसपुढे आव्हान
3 चिंचवडला शिवसेनेच्या बंडखोरीला राष्ट्रवादीचे पाठबळ
Just Now!
X