विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पत्राद्वारे दिला. माजी आमदार दीपक साळुंखे हे जिल्ह्यातील शरद पवारांचे अत्यंत विश्वसनीय व कट्टर समर्थक मानले जातात.मात्र साळुंखे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले. माढय़ाचे राष्ट्रवादीचे पवारनिष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाविषयीही उत्सुकता वाढली आहे.
गेल्या काही दिवसा पासून दीपक साळुंखे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत होते. नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान देखील त्यांची बेचैनी सर्व कार्यकर्त्यांना दिसून येत होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगोल्यातील मताधिक्य साठी दीपक साळुंखे यांच्या डोक्यावरची केस देखील काढून टिंगल केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर साळुंखे हे राष्ट्रवादीचे नाराज असल्याचे दिसून येत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे साळुंखे पाटलांनी प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात आगामी विधानसभेसाठी सांगोला तालुक्यात लक्ष देण्यासाठी वेळ हवा आहे. कसे राजीनाम्याचे कारण पुढे केले आहे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना पत्राद्वारे राजीनामा दिला आहे.दरम्यान, साळुंखे गेल्या दोन महिन्यापासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.असे असले तरी साळुंखे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 1:32 pm