राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले आणि त्यांनी जाताना बारामतीला जातो आहे असं माध्यमांना सांगितलं. साडेसात वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होती. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले. ते जाताना चिडलेले होते आणि जाताना त्यांना बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, “मी बारामतीला जातो आहे, बैठक रद्द झाली आहे. पुढचं मला काहीही माहित नाही” असं सांगून अजित पवार कारमध्ये बसून निघून गेले. दरम्यान याबाबत शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देत अजित पवार मुंबईतच आहेत असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. बारामतीला जातो हे वक्तव्य त्यांनी चेष्टेने केलं असावं असंही पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत स्पष्टीकरण यांनीही हे स्पष्ट केलं काही गोष्टी राजकारणात गोपनीय ठेवण्यात येतात. अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं, ते याच भावनेतून केलं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसनेही फार काही तर्क किंवा अंदाज काढू नका असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसंच आमची प्राथमिक चर्चा होती काँग्रेसच्या अंतर्गत ती झाली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. आजची बैठक रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने कळवलं आहे, त्यात फार काही मोठं नाही. आज बैठक झाली नाही तर उद्या बैठक होईल असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. आमची बैठक होणं आवश्यक आहे ती आम्ही करतो आहोत असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.