महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे असं समजतं आहे. अखेर किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार असल्याचं समजतं आहे. २१ तारखेला निवडणूक पार पडली आणि २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मात्र शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आमच्यापुढे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली. ज्यामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

दर ४ आमदारांमागे १ मंत्रिपद अशी अट काँग्रेसने ठेवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मिळाल्या. आता आघाडीसोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने मंत्रिपदांचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. एवढंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घेतील अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

बुधवारपासून काय काय घडलं?

बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची बैठक पार पडली

या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली

बैठकीतून काँग्रेस नेते उठून गेले आणि सोनिया गांधी यांना भेटले

रात्री उशिरा सरकार स्थापनेसाठी आम्ही सकारात्मक आहोत असं आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं

या बैठकांवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचंही लक्ष होतं

बुधवारी उद्धव ठाकरे यांचीही सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा

आज सकाळी संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट

भेटीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या

या बैठकांमध्येच हा फॉर्म्युला ठरला असल्याचं समजतं आहे

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनडीएतून त्यांना बाहेर काढण्यात आलं. सोनिया गांधी या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राजी होत नव्हत्या. मात्र अखेर त्यांनीही सहमती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सगळी चक्रं फिरली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या दिशेने घडामोडी घडल्या. आता फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. नेमकं काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.