05 August 2020

News Flash

BLOG : शरद पवारांची ‘पॉवरफुल’ इनिंग

महाराष्ट्राची जनता कायम लक्षात ठेवेल असेच हे निवडणूक निकाल ठरले आहेत

२०१९ ची विधानसभा निवडणूक लक्षात राहील ती शरद पवार या राजकारणातल्या तेल लावलेल्या पैलवानामुळे यात काहीही शंका नाही. वसंतदादा पाटील यांच्या काळात पुलोदचा प्रयोग करणारा हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही आपलं स्थान कायम ठेवून आहे हे पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. तेल लावलेला पैलवान असा त्यांचा उल्लेख कायम केला जातो. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत पुन्हा एकदा आला. याचं कारणही खास आहे ही कुस्ती एकतर्फी आहे असं वाटलं होतं तशा घोषणाही भाजपाकडून दिल्या जात होत्या. शिवसेनाही तेच म्हणत होती. अशावेळी ७९ वर्षांचा हा नेता प्रचाराच्या आखाड्यात उतरला आणि मी अजून म्हातारा झालो नाही. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात मला पैलवान दिसत नाही असं म्हणत प्रचार सुरु केला.

महाराष्ट्रात विरोधकांना चेहराच उरला नाही अशी जी काही ओरड सुरु होती ती पोकळी भरुन काढण्याचं काम शरद पवारांनी केलं. याचं कारण त्यांचं राजकारणातलं अचूक टायमिंग. १८ ऑक्टोबरला त्यांनी साताऱ्यातल्या भर पावसात केलेलं भाषण ते खास गाजलं, शरद पवार पावसात भिजले आणि सत्ता आमचीच येणार, २२० पार जाणार म्हणणाऱ्या भाजपाला घाम फोडला. “चूक झाली की आपल्या माणसांकडे ती कबूल करायची असते, लोकसभेच्या वेळी माझ्या हातून उमेदवारी देताना चूक झाली. आता श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांना तुम्ही निवडून द्या आणि माझी चूक सुधारण्यासाठी सहकार्य करा” अशी भावनिक साद शरद पवारांनी घातली. त्याला साजेसा प्रतिसाद देऊन सातारकरांनी उदयनराजेंना हरवून श्रीनिवास पाटील यांना विजय मिळवून दिला. भाजपाने उदयनराजेंना पक्षात प्रवेश देण्याची खेळी शरद पवारांनी एका भाषणाने परतवून लावली. एवढंच नाही तर ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली त्यांनाही पराभव पत्करावा लागला.

शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा निवडणुका महाराष्ट्राला परवडणार नाहीत म्हणत भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा करताना पवारांनी शिवसेनेची अवस्था एका फटक्यात दयनीय केली होती. भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत १२२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने काही भूमिका जाहीर करायच्या आतच निकालाच्या दिवशी शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. स्थिर सरकारसाठी आम्ही भाजपाला बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहोत असं त्यांनी जाहीर केलं आणि शिवसेनेचं महत्त्व कमी करण्याचं काम केलं. नंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र आले. पण त्यांचं तुझं माझं जमेना ही जी अवस्था झाली होती त्याला जी अनेक कारणं होती त्यातलं एक कारण शरद पवारही ठरले यात काहीही शंका नाही. या खेपेला त्यांनी अद्याप तरी अशी काही खेळी केलेली नाही मात्र दिवाळीनंतर ज्या बैठकांचं सत्र सुरु होईल त्यात शरद पवार अशी खेळी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावेळच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा. युती धर्म पाळला तर या दोन्ही पक्षांचं सरकार येईल हे निश्चित आहे. मात्र योग्य टायमिंग वापरुन उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना साद घातली तर शरद पवार आणि काँग्रेस पक्ष हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवं समीकरण समोर आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांना अनप्रेडिक्टबेल असंही म्हटलं जातं. त्यामुळे ते काय खेळी खेळतील याचा अंदाज आत्ता लावणं कठीण आहे.

शरद पवार यांनी केलेली भाषणं, त्यांनी विरोधी पक्षाला दिलेला चेहरा, तरुणालाही लाजवेल असा त्यांचा उत्साह या सगळ्या गोष्टी पाहिल्या की त्यांच्यातल्या कुशल आणि मुरब्बी राजकारण्याची साक्ष पटते. आता सत्ता हातात नाही विरोधात बसायचं आहे हे ऑलमोस्ट ठरलं आहे. मात्र उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्तेच्या चाव्या तूर्तास शरद पवार यांच्या हाती नाहीत. पण त्या आल्या तर ती संधी शरद पवार सोडणार नाही. सगळी लढाई एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे लढायची आणि विजय किती आवाक्यात होता ते दाखवून द्यायचं हे शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्यांच्या या टायमिंगला जवाब नाही. एकतर्फी निवडणूक असा शिक्का बसलेल्या निवडणुकीत भाकरी फिरवण्याचं काम केलं ते शरद पवारांनी. त्यामुळेच वेगळे ठरतात. महायुतीचा विजय झाला असला तरीही शरद पवारांची ‘पॉवरफुल’ इनिंग महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 3:24 pm

Web Title: special blog on sharad pawar and his strategy scj 81
Next Stories
1 …आणि वाढली आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याची शक्यता
2 रिमेकची खेळी
3 BLOG : अदखलपात्र राज ठाकरे
Just Now!
X