27 May 2020

News Flash

BLOG : ‘अशांत’ राज ठाकरे शांत का?

राज ठाकरे शांत का? प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख अशांत अशासाठी होतो कारण आक्रमक, धडाडीचे नेते अशीच त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. मात्र ईडी चौकशी झाल्यापासून एखादं वादळ शांत व्हावं तसेच राज ठाकरे शांत झाले आहेत. त्यामुळे ‘अशांत’ राज ठाकरे शांत का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेनेला राज ठाकरेंनी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला तेव्हा त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता राज ठाकरे काय करणार? असाही प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आणि शिवसेनेला पर्यायी पक्ष म्हणून त्यांनी हा पक्ष उभा केला. ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. काका बाळासाहेब ठाकरे यांना विठ्ठल मानून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. ” माझा माझ्या विठ्ठलाला विरोध नाही मात्र त्याच्या भोवती असलेल्या बडव्यांना विरोध आहे” असं म्हणत त्यांनी मनसेची स्थापना केली.

हिंदुहृदयसम्राट ही उपाधी जशी बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे लावली जात होती. त्याच आशयाची उपाधी राज ठाकरेंच्या नावापुढेही लागू लागली. ‘मराठी हृदयसम्राट’ असं राज ठाकरेंना अनेकजण संबोधू लागले. त्याचं कारणही तसंच होतं. मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी शिवसेनेकडून अशा प्रकारे ‘हायजॅक’ केला की ते शिवसेनेलाही कळलं नाही. राज ठाकरे या नावाभोवती ‘ठाकरे’ आडनावाचं वलय तर आहेच. मात्र महत्त्वाचं होतं ते म्हणजे त्यांचा करीश्मा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरेंचा होणारा भास. अगदी त्याच शैलीत, त्याच अविर्भावत राज ठाकरे भाषण देतात. अवघ्या तीन वर्षात मनसेचा प्रभाव इतका जास्त होता की २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले. अबू आझमींना लगावलेली कानशीलात!, मराठी पाट्यांसाठी झालेलं आंदोलन, टोलप्रश्नी केलेलं आंदोलन या सगळ्यामुळे मनसेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. एक पर्याय म्हणून मनसेकडे पाहिलं जाऊ लागलं. अगदी नाशिक महापालिकेत सत्ताही काबीज करता आली. मात्र ज्या छगन भुजबळांवर टीका करुन आणि त्यांची नक्कल करुन राज ठाकरेंनी नाशिकची सत्ता काबीज केली शेवटी त्यांच्याशीच हातमिळवणी करुन त्यांना ही सत्ता टीकवावी लागली. इथे सुरुवात झाली ती मनसेचा चढता आलेख ढासळण्याची. एखादं भलं मोठं जहाज भरकटतं तशीच मनसेची अवस्था होण्यास सुरुवात झाली.

२०१२ मध्ये झालेल्या ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान तर ठाकरे घराण्याचं ‘रक्तचरित्र’च समोर आलं होतं. कारण हा ‘सामना’ थेट काका-पुतण्या असा झाला होता. दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरेंवर आरोप केले होते. तसंच राज आता परत येणार नाही असंही एका मुलाखतीत बोलून दाखवलं होतं. ज्यावर राज ठाकरेंनीही प्रत्युत्तर देत नेमकं काय काय घडलं ते सांगितलं होतं. इतकंच नाही तर समोरासमोर चर्चा करु असंही म्हटलं होतं.  २०१४ मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीत राज ठाकरेंनी उमेदवार दिले आणि प्रचार केला तो मोदी आणि अमित शाह यांचा. अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्यावर मनसोक्त टीका करत त्यांनी त्यांची भाषणं गाजवली. या भाषणांचा चांगला प्रभाव विधानसभा निवडणुकीत होईल असं वाटलं होतं. मात्र तो मुळीच झाला नाही. मोदी लाटेत मनसेची अवस्था अधिकच बिकट झाली. राम कदम, प्रवीण दरेकर यांच्यासारख्या नेत्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.

दरम्यान मनसे आणि शिवसेना यांच्यातलं कुरघोडीचं राजकारण सुरुच राहिलं. २०१४ ची विधानसभा निवडणूक लागली आणि राज ठाकरेंच्या सभांचा धडाका पुन्हा सुरु झाला. त्यावेळी त्यांना भोवलं ती दोन वक्तव्यं एक तर “मी निवडणूक लढवणार” अशी घोषणा त्यांनी केली होती जी नंतर त्यांनी मागे घेतली. दुसरं वक्तव्यं होतं चिकन सूप आणि बटाटेवडे याबाबतचं.. जे महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करताना “बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात फक्त दोन बटाटेवडे मिळत होते, मी त्यांना चिकन सूप नेऊन दिलं मग मी खंजीर खुपसला असं इतर लोक का म्हणतात?” हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या वक्तव्यावरुन राज ठाकरेंवर चांगलीच टीका झाली.

२०१४ च्या निवडणुकीत मनसेचे शरद सोनवणे हे एकमेव आमदार निवडून आले. त्यांनीही आता मनसेची साथ सोडली आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीतही मनसे ‘दिलसे’ प्रगती करु शकला नाही, अधोगती मात्र सुरुच राहिली. मग राज ठाकरेंनी सुरु केल्या शरद पवार, छगन भुजबळ यांच्या भेटीगाठी. ज्या अजित पवारांवर तोंडसुख घेतलं होतं त्यांनाही राज ठाकरे भेटले हे महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते काय करणार? हा प्रश्न निर्माण झाला होताच. शिवाय शरद पवार च्या ७५ व्या वाढदिवशी राज ठाकरेंनी त्यांची तोंडभरुन स्तुतीही केली होती. एवढंच नाही तर पुण्यात एक प्रदीर्घ मुलाखतही घेतली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात महाराष्ट्रात राज ठाकरे हे असे एकमेव नेते होते ज्यांनी एकही उमेदवार न देता १० सभा घेतल्या. यावेळी त्यांची भूमिका पूर्ण बदलली होती. राज ठाकरे यांनी चक्क मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केला. २०१४ च्या तुलनेत अगदीच विरोधी भूमिका. नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी, राफेल घोटाळा यावरुन राज ठाकरे मोदी सरकारवर चांगलेच बरसले. तसेच बालाकोट एअर स्ट्राईकवरुनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे त्यांचं वाक्यही खास गाजलं. पहिल्या डिजिटल गावाची म्हणजेच हरिसालची अवस्था काय आहे हेदेखील लोकांनी पाहिलं त्यांच्या सभांनाही उत्तम प्रतिसाद दिला. राज ठाकरे म्हणजे ‘बारामतीचा पोपट’ आहे अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली. मात्र राज ठाकरेंनी या टीकेलाही तोडीस तोड उत्तर दिलं.

राज ठाकरेंनी मोदी सरकारविरोधात आणि भाजपा शिवसेना सरकारविरोधात एका पाठोपाठ एक व्यंगचित्रांची मालिकाही चालवली होती. त्या व्यंगचित्रांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल असं वाटलं होतं मात्र घडलं भलतंच. भाजपा ३०० जागांचा आकडा पार करुन लोकसभा निवडणूक जिंकली. ‘अनाकलनीय’ एवढी एकाच शब्दाची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी तेव्हा दिली होती.

आता २०१९ ची विधानसभा निवडणूक लागली.  २१ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षाचं नेतृत्त्व ओघाने चालून आलं होतं. कारण ईव्हीएमविरोधात विरोधकांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्याचं नेतृत्त्व राज ठाकरेंनी केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र २१ ऑगस्ट रोजी कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरेंची ईडी मार्फत चौकशी करण्यात झाली. १२ तासांपेक्षा जास्त काळ राज ठाकरेंची चौकशी करण्यात आली. त्यानंतर एक ट्विट राज ठाकरे यांनी केलं की कितीही चौकशा करा मात्र मी बोलणारच. ऑगस्ट महिन्यात हे ट्विट त्यांनी केलं. आता ऑक्टोबर महिना उजाडला आहे. मात्र राज ठाकरे अजून तरी शांत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी-शाह विरोधी प्रचार केल्याने विधानसभेला आघाडीत आपल्याला घेतलं जाईल असं बहुदा राज ठाकरेंना वाटत असावं. मात्र तसं काहीही घडलं नाही. काँग्रेसने नकार दिल्याने आघाडीत राज ठाकरेंना स्थान मिळालं नाही. आता मनसे उमेदवार उभे करणार का? किती जागा लढवणार? मनसेकडे उमेदवार उरले आहेत का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत. ५ ऑक्टोबरला जे काय बोलायचं ते बोलणार आहे असंही राज ठाकरेंनी सांगितलं. मात्र ते अजून तरी शांत आहेत. त्यांचा कुंचलाही शांत आहे. एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना आदरांजली वाहणारं व्यंगचित्र काढल्यानंतर एकही व्यंगचित्रही काढून ट्विटरवर पोस्ट केलेलं नाही.राज ठाकरे शांत आहेत की ही वादळापूर्वीची शांतता आहे हे आता ५ तारखेला स्पष्ट होईल. तूर्तास तरी अशांत राज ठाकरे शांत का? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2019 6:12 pm

Web Title: special blog on why raj thackeray is silent scj 81
Next Stories
1 BLOG: निवडणूक तोंडावर, विरोधक वाऱ्यावर!
2 BLOG : राज ठाकरेंचे ‘ते’ उद्गार शरद पवारांच्या बाबतीत पुन्हा ठरले खरे!
3 BLOG: पाकिस्तानपेक्षा पवार, ठाकरेंना बालाकोटची जास्त चिंता
Just Now!
X