निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यात सट्टाबाजारातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकीकडे सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीत असताना सट्टा बाजाराने मात्र भाजपाला पसंती दिल्याचे व राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात कमी पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुका पार पडत असून या निवडणुकांवर तब्बल ३० हजार कोटी रूपयांचा सट्टा लावण्यात आला आहे असं सांगण्यात येत आहे.

सट्टा बाजारात सट्टेबाजांनी भाजपाला १२० जागांसाठी १ रूपया ६० पैसे, शिवसेनेला ८५ जागांवर ३ रूपये, काँग्रेसला ३० जागांवर २.५० पैसे तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३० जागांवर ३ रूपये ५० पैशांचा भाव दिला आहे. प्रत्येक निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर सट्टाबाजार हा तेजीत असल्याचं पहायला मिळतं. मुंबईसह देशभरातून तसंच परदेशातूनही या निवडणुकीवर सट्टा लावण्यात आल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.