अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,”नियम ५७ची नोटीस दिली आहे. अध्यक्षांची घोषणा करायची आहे. पण, नियम ५७ची सूचना महत्वाची आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्हाला मांडण्याची अनुमती द्यावी. राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचं, मासेमारी करणाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना तात्काळ २५ हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी बोलताना या विषयाला हात घातला. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉल केला होता,” असं सांगत ठाकरे म्हणाले,” “राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आणि आर्थिक मदतीची मागणी करायला हवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.