धनुष्यबाणाच्या हाती घड्याळ गेल्याने विकासाची चक्रं उलटीच फिरणार असा टोला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. ज्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करुन या निर्णयाचा निषेध केला आहे. मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगितीला देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर असं राजकारण बरं नाही.

उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरे कारशेडला स्थगिती दिली आहे. आरे कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीवरुन शिवसेनेने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसंच आमचं सरकार आलं तर आम्ही आरेला जंगल घोषित करणार असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आणि तो आरे संदर्भातलाच होता. आरे कारशेडबाबत पूर्ण चौकशी होणार. तोपर्यंत आरेमधील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं.

या निर्णयानंतर भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईकरांची हानी करणारा हा निर्णय आहे असं आशिष शेलरा यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय घृणास्पद आहे असंही ते म्हणाले.