राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेच निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर बोलताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजून निर्णय झालेला नाही. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,”अशी माहिती त्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. दरम्यान, निवडणूक निकालात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केलं आहे. त्यानंतर भाजपाकडून जादूई आकड्याची चाचपणी सुरू असून, शिवसेनेला सोबत घेण्याच्या दृष्टीनेही भाजपामध्ये चर्चा सुरू आहे.

भाजपाच्या कोअर कमिटीची रविवारी दुपारी वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत भाजपाचा अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा असल्यानं सगळ्यांच्याच नजरा वर्षा बंगल्याकडं लागल्या होत्या. बैठक संपल्यानंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली. मुनगंटीवार म्हणाले, “बैठकीत राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर चर्चा करण्यात आली. ४ वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतरच सत्ता स्थापनेच्या दाव्यासंदर्भात माहिती दिली जाईल. बैठक झाल्यानंतर पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवणार आहे,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

वर्षावर भाजपाची पुन्हा बैठक होणार आहे. तर काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागले आहे. मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी ठाकरे दाखल झाले आहेत. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाकाळपासून आमदारांबरोबरच आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने उद्धव ठाकरे काय चर्चा करणार? कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळातून नजरा लागल्या आहेत.