भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपुरात पोहचले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या सगळ्यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठकांचं सत्र सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आणि राष्ट्रपती राजवट लागू करुन राज्यपालांनी दया दाखवली असा टोलाही लगावला. त्यानंतर आज दिवसभर विविध घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार  हेदेखील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी नागपुरात पोहचले आहेत.

आता सरसंघचालक मोहन भागवत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात काय चर्चा होते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय झाल्यापासून भाजपाने त्यांच्या परिने हालचाली सुरु केल्या आहेत. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजपाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असं म्हटलं आहे. एबीपी माझाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

सुधीर मुनगंटीवार आणि मोहन भागवत यांच्यात अर्ध्या तासांपासून चर्चा सुरु होती. भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपा बहुमतासाठी प्रयत्न करणार असल्याचं नारायण राणे यांनी मंगळवारीच सांगितलं होतं. त्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते स्पष्ट झालेलं नाही.