News Flash

सुप्रीम कोर्टात काय झाले? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी हे ११ मुद्दे महत्त्वाचे!

दोन्ही बाजूच्या वकिलांची कोर्ट रूममध्ये चांगलीच शाब्दीक खडाजंगी झाली.

(संग्रहित छायाचित्र)

भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत कोणताही ठोस निर्णय झाला नसला तरी, दोन्ही बाजूच्या वकिलांची कोर्ट रूममध्ये चांगलीच शाब्दीक खडाजंगी झाली. सुप्रीम कोर्टात कोणत्या वकिलाने काय दावा केला, याबाबतचा हा घटनाक्रम…

१. निवडणुकीपूर्वीच युतीची कल्पना राज्यपालांना होती -तुषार मेहता
राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा, सरकारच्या वतीनं बाजू मांडतांना तुषार मेहता म्हणाले, निवडणुकीपूर्वीचं युतीची कल्पना राज्यपालांना होती. त्यामुळंच त्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत वाट बघितली. त्याचबरोबर तीन पक्षांनाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

२. अजित पवारांनी दिलेलं समर्थनाचं पत्र न्यायालयात सादर
भाजपानं सरकास स्थापनेचा दावा केला. राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाचं पत्र सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सादर केलं. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. ज्यात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी आणि स्थिर सरकार यावं, यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटल्याचं तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

३. माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा आहे; मुख्यमंत्र्यांचं पत्रही सादर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेलं पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. “माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयाला वाचून दाखवलं.

४. एक पवार सोबत, तर दुसरे विरोधात आहे -रोहतगी
भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.

५. ज्या पाठिंबा दिला, त्यांनी तो मागे घेतला आहे का?; न्यायालयाकडून विचारणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचं महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती खन्ना यांनी “ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांची स्थिती काय. त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?, असा प्रश्न विचारला. त्यावर रोहतगी म्हणाले, “सध्या आम्हाला निश्चित सांगता येणार नाही. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, बहुमत चाचणीत हे दिसेल.

६. अनेक प्रकरणांमध्ये २४ तासांमध्येच बहुमत चाचणी घेण्यात आली -न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाच्या सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी सुरू असून, राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता आणि मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले, “अशा प्रकरणांमध्ये न्यायालयानं मागील काही काळात दिलेल्या निर्णयात २४ तासांत बहुमत चाचणी घेण्यात आली आहे. तर काही प्रकरणांमध्ये ४८ तासांचा वेळ देण्यात आला होता,” असं खन्ना म्हणाले.

७. “राज्यपाल शिस्तीत काम करत होते, तर एका रात्रीत घाई का केली?”
शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. सिब्बल म्हणाले, “शपथविधी होण्याच्या पूर्वसंध्येला तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अशी कोणती राष्ट्रीय आपत्ती आली होती की, सकाळी शपथविधी करण्यात आला. ९ नोव्हेंबरपर्यंत शिस्तीत काम करणाऱ्या राज्यपालांनी अचानक एका रात्रीत घाई का केली?, असा सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला.

८. आमदारांच्या सह्यांचं पत्र दुसरीकडं जोडण्यात आलं -सिंघवी
राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ‘आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भाजपासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,’ अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली.

९. आम्ही हरायला तयार आहोत, पण बहुमत चाचणी घ्या -सिंघवी
राष्ट्रवादीची बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, आम्ही सभागृहात पराभूत व्हायला तयार आहोत. पण, तरीही ते (भाजपा) बहुमत चाचणी घ्यायला तयार नाही, असं सिंघवी म्हणाले. यावेळी त्यांनी १५४ आमदारांच्या सह्यांचं पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. मात्र, या खटल्याची व्याप्ती वाढवणार नसल्याचं सांगत न्यायालयानं ते घेण्यास नकार दिला.

१०. सत्तेचा तिढा सोमवारीही कायम; सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निकाल
दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर मंगळवारी सकाळी १०:३० सुनावणी होणार आहे. उद्या (२६ नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे. आता राज्याचे सर्व लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 12:17 pm

Web Title: supreme court hearing about maharashtra government formation what happened in sc pkd 81
Next Stories
1 “शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार”
2 “भाजपाला सत्तेसाठी चंबळमधील डाकूंसारखी गुंडगिरी करायची गरज काय?”
3 शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, राजभवनात सोपवलं पत्र
Just Now!
X