भाजपा-शिवसेनेचा वचननामा म्हणजे गाजरांचा पाऊस आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळे यांना डेंग्यू झाल्याने त्या इतके दिवस प्रचारासाठी उतरल्या नव्हत्या. आज अखेर त्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या असून त्यांनी भाजपा आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपा आणि शिवसेना यांचं सरकार हे केलेली विकासकामं सांगू शकत नाहीत कारण त्यांनी कोणतीही विकासकामं केलेली नाहीत. एवढंच नाही तर यांचे वचननामे म्हणजे गाजरांचा पाऊस आहे असाही टोला त्यांनी लगावला.

शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता, “मागील पाच दशकांपासून शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही हे सगळ्यांना ठाऊक आहे” त्याचमुळे शरद पवारांवर टीका केली जाते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याचं देशातले नेते सांगत आहेत. त्याबाबत केंद्राचं अभिनंदन मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा मुद्दा का आणत आहात? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला.

सुप्रिया सुळे यांना १० रुपयात थाळी आणि ५ रुपयात थाळी याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे म्हणजे गाजरांचा पाऊस आहे अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम अतिआत्मविश्वासात वावरत असतात. या खेपेला परिवर्तन नक्की होणार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार असाही विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.