सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर मंगळवारी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडमोडीनंतर सुटला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देत आहेत. या शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या सर्वच आमदारांचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडून स्वागत केले गेले. दरम्यान सत्तासंघर्षाच्या कालावधीत भाजपाबरोबर गेलेले व पुन्हा माघारी आलेले आपले बंधु अजितदादा यांचे या ठिकाणी आगमन होताच, सुप्रियाताईंनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. अजितदादांनी देखील मुक्त मनाने हे स्वागत स्वीकारले. यावेळी कुटुंब अखंड असल्याचं समाधान या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं.

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान अजितदादांनी जेव्हा अचानकपणे भाजपाबरोबर जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा सुप्रिया सुळे अतिशय व्यथित झाल्या होत्या. कुटुंबात फुट पडली असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर त्यांनी सातत्याने अजितदादाना परत येण्यासाठी भावनिक आवाहन केले. त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न देखील केले होते. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व कुटुंबातील सदस्य देखील अजितदादांनी परत यावे यासाठी प्रयत्नशील होते. अखेरीस मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजितदादा यांनी भाजपा सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यानंतर मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आणखी वाचा- ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत घोषणाबाजी

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.