“जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.  इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी महापूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. याच वेळी त्यांनी महापूरस्थितीवर कायमस्वरूपी आणि शाश्वत प्रकारची उपाय योजना केली जाणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “महाराष्ट्र कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांना हक्काचे पाणी मिळते. त्याहूनही अधिक पाणी महापुरामुळे वाया जाते. जिल्ह्याच्या एका भागात महापुर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा अशी विसंगत स्थिती निर्माण आल्याचे दिसते . हे चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्याकरिता जागतिक बँकेचे २३ तज्ज्ञांचे पथक पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. त्यातून अशा प्रकारची योजना नियोजन केले जाईल की वीज, पाणी पुरवठा, रस्ते, पूल हे महापूर काळातही बंद न पडता कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील. पुराचे पाणी दुष्काळी भागाला जाऊन तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. या तिन्ही जिल्ह्यात पूरस्थिती येणार नाही अशी कायमची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी ५ ते ६ वर्षांचा अवधी लागेल. जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांनीही या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी वाघ
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलत आहे,असा उल्लेख करून ते म्हणाले तिहेरी तलाकचा कायदा केल्याने त्याचे स्वागत मुस्लिम महिलांनी करून मला आज राखी भेट स्वरूपात दिली. गेल्या ७० वर्षात काँग्रेसला करता आले नाही ते काश्मीर मधील ३७० कलम हटवण्याचे काम मोदी नावाच्या वाघाने करून दाखवले. त्यामुळे यंदा प्रथमच देशभरात देशाच्या सर्व भागप्रमाणे काश्मीरमध्येही तिरंगा ध्वज फडकू शकला. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी ही जनादेश यात्रा काढली आहे. त्याला तुमचा प्रतिसाद असावा”, असा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.

इचलकरंजीत विक्रमी सभा
नागपूर, औरंगाबाद, पुणे, सातारा येथे विक्रमी सभा झाल्या. त्याहूनही अधिक मोठी सभा इचलकरंजीमध्ये आमदार सुरेश हाळवणकर यांनी घडवून आणल्याने आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील यशाची खात्री झाली, असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुन्हा आपलेच सरकार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, लहान वयात दूरदृष्टी लाभलेला मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश यात्रा निघाली असून तिला मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा सत्ता येणार हे संगण्यासाठी भविष्यवेत्ताची गरज उरली नाही,अशा शब्दात त्यांनी पुन्हा आपलेच सरकार येणार याची खात्री व्यक्त केली.

घोटाळेबाजांना सोडणार नाही
संयोजक आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धान्याची कोठारे उघडून पूरग्रस्तांना तीन महिन्यांचे धान्य दिले. इचलकरंजीच्या विकासाच्या सर्व योजनांना त्यांनी प्रतिसाद दिला तरीही काही डोमकावळे शहराचे वाटोळे झाले आहे अशी बोंब ठोकत आहेत. याचा निर्माता कोण आहे हे लोक जाणत आहेत, असे म्हणत त्यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी प्रकाश आवाडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. स्वतःच्या सूतगिरण्या ३०० कोटी रुपये तोट्यात ठेवणारे वस्त्रनगरीचे नेते होऊ शकत नाहीत. पॉवरलूम मेगा क्लचटरच्या नावाने करोडोंचा घोटाळा केला आहे. त्यांच्या मागे लागलो नाही. पण यापुढे पी. चिदंबरम, डी. के.शिवकुमार यांच्या प्रमाणे त्यांच्या मागे लागावे लागेल, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.