स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रकांत पाटील ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्यास, मी त्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. राजू शेट्टी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भूमिका मांडली.

“आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र अजून माझी मानसिकता झालेली नाही. जर चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातून विधानसभा निवडणुक लढविणार असल्यास, मी त्यांच्या विरोधात उभा राहणार,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “देशभरातील तरुणांच्या हातचा रोजगार गेला आहे. यावर केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले असताना, किमान ते तरी तरुणाच्या प्रश्नांवर बोलतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे भाषण करून जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळे आता तरुणांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे”.

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनादेश यात्रेत व्यस्त आहेत. या यात्रेदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांची भाजपामध्ये मेगाभरती सुरू आहे. मात्र मागील पाच वर्षात किती रोजगार आला आणि किती तरुणांच्या हातचा रोजगार गेला. यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या भरतीबाबत बोलतात. मुख्यमंत्रीसाहेब तरुणांच्या रोजगाराची मेगाभरती केव्हा सुरू होणार यावर भूमिका मांडा,” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

तसंच ते पुढे म्हणाले की, “केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तेत येऊन कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यात कडकनाथ घोटाळ्यामुळे असंख्य शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. यासह अनेक प्रश्नावर निष्क्रिय ठरलेल्या सरकारविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेदरम्यान शेतकर्‍यांचा उद्रेक बाहेर आला असून त्यातून मुख्यमंत्र्याच्या गाडीवर कोंबड्या फेकून निषेध व्यक्त करण्यात आला”.

“मागील २५ वर्षांपासुन मी चळवळीमध्ये असून सर्व सामान्य शेतकरी वर्गाच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याचे काम करत आहे. या काळात सर्वाधिक आंदोलने केली. त्यादरम्यान असणार्‍या सरकारांनी विरोधकांना त्रास देण्याचे काम केले नाही. मात्र २०१४ पासून केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा सरकारकडून आंदोलनकर्त्याचा आवाज दाबण्याचे काम करण्यात येत आहे,” अशा शब्दांत भाजपाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली.