महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत निर्णय घ्यायचा तो जलदगतीने घ्या अशी मागणी शिवसेनेने काँग्रेसकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार की नाही याचे उत्तर कदाचित मिळू शकते. अशात शिवसेनेने काँग्रेसकडे निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी केल्याचे समजते आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत काय ठरणार ते पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान २२ तारखेला म्हणजेच येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी बोलवले आहे.

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दाखल झाले आहेत. तसंच काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेतेही दिल्लीच्या मार्गावर आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांच्यातही आज बैठक झाल्याचे समजते आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्त्व करावे ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर सगळे नेते मुंबईत परतणार आहेत. या सगळ्यानंतरच महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सुटणार की नाही याचे उत्तर मिळू शकणार आहे.

दरम्यान शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी जी काही वक्तव्यं केली त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय. आमची महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवर किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. जे सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारं होतं. आता येत्या दोन ते तीन दिवसात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.