सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सत्तास्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा सुरू झाली होती. दुसरीकडे जयपूरमध्ये राज्यातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासंदर्भात काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांबाबत खुलासा केला आहे.

काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सर्व आमदारांबरोबर चर्चा केली आहे. यावेळी आमचे प्रभारी व सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सर्वांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. शेवटी या संदर्भात निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. जो निर्णय हायकमांड देईल त्यानुसार आमची पुढची वाटचाल असणार आहे. तसेच, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे अहमद पटेल हे देखील आज जयपूरमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अगोदर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जु खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार असल्याच वक्तव्य केलं आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे, आमचा देखील तोच निर्णय आहे. मात्र हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. जयपुरात काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर खर्गे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसशिवाय आता शिवसेना सत्तेत कशी बसणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.