निवडणुकांपूर्वी मनसेला आघाडीत घेण्याचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं असलं तरी आता राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपलं मन मनसेच्या बाजूनं वळवल्याचं दिसत आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जरी मनसे आघाडीत सामिल झाली नसली तरी आता मात्र निरनिराळ्या कारणांमुळे मनसेला आघाडीचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जवळीक वाढल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अविनाश जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अविनाश जाधव यांनीदेखील राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी कल्याण पश्चिम, नाशिक, मुंबई आणि अन्य ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर ठाण्यातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीने मनसेला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला कोणताही फरक पडणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांमुळे जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.