राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा आज सायंकाळी ६ वाजता थंडावल्या आहेत. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळनंतर शांत झाल्याचे दिसत आहे. सोमवारी (२१ ऑक्टोबर ) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तर, २४ ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल येणार असून, त्यावर राज्यात कोणाचे सरकार असणार हे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात एकूण २८८ मतदारसंघांत ३ हजार २३९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. राज्यात ३१ ऑगस्ट पर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झालेली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सर्व पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून एकूण ६५ सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, तर त्यापूर्वी महिनाभरातील महाजनादेश यात्रेदरम्यान सुमारे १६० सभा घेतल्या होत्या. याशिवाय निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सुमारे १४४ मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढले होते. याचबरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदींसह राज्यातील प्रमुख पक्ष नेत्यांनीही सभांचा धडका लावला होता.

प्रचार कालावधीत सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रोड शो, रॅली आणि सभांच्या कार्नर बैठका आदींच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले. तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सभा घेतल्याने अधिकच रंगत वाढली होती.आता सर्व उमेदवारांना मतदानाच्या दिवसाचे वेध लागले आहेत. त्या अगोदर वैयक्तिक गाठी भेटींवर उमेदवारांकडून जोर दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय, मतदानाच्या दिवसापर्यंत छुपा प्रचारही सुरू असल्याचेही दिसून येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The assemblys campaign was stopped msr
First published on: 19-10-2019 at 19:45 IST