निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतच बिघाडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशाच आता काँग्रेसच्या दाक्षिणात्य नेत्यांनी शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची इच्छा असूनही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी दिल्ली तसेच राज्यातील आमदार ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेस त्या जयपूरमधून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक विचार केला जात होता. महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते जयपूर आणि दिल्लीमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेतेही बैठकीसाठी उपस्थित होते.

केरळमधील काँग्रेसच्या नेत्यांनाही शिवसेनेला काँग्रेसने साथ देऊ नये याच बाजूने मत दिल्याचे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. केसी वेणूगोपाल, ए.के. अ‍ॅण्टनी आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनाही शिवसेनेसोबत युती करण्यास सकारात्मक नसल्याचे मत सोनिया यांच्याकडे व्यक्त केले होते. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधीही शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक नसल्याचे समजते. गुजरातचे काँग्रेस महासचिव राजीव सातव यांनाही राज्यामध्ये एक-तृतीयांश सूत्र वापरून सत्तेत सहभागी होण्याचे मत व्यक्त केल्याचे समजते.

शिवसेनेचे सुरवातीचे राजकारण हे दाक्षिणात्यांविरोधातील होते त्यामुळेच काँग्रेसमधील सोनिया यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या दाक्षिणात्य नेत्यांनी विचारसरणीचे कारण देत शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर युती करण्यास अनुकूलता दर्शवली. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘उठाओ लुंगी बजाओ पुंगी’ ही दाक्षिणात्यांविरोधातील भूमिका चांगलीच वादग्रस्त ठरली होती. याशिवाय काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असून शिवसेनेसारख्या जहाल मतवादी पक्षाबरोबर गेल्यास राष्ट्रीय स्तरावरील राजकारणामध्ये त्याचा फटका बसू शकतो अशी भिती काही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यातच सायंकाळी सहाच्या सुमारास सोनिया गांधी यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली आणि त्यानंतर काँग्रेसने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे समजते.