मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याकरिता राबविण्यात आलेल्या मोहिमेला नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे १० लाख मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दुबार नोंदणी झालेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या दोन लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आठ लाखांपेक्षा अधिक मतदार वाढल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक  अधिकारी बलदेव सिंग यांनी गुरुवारी दिली. राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे कमी प्रमाण ही चिंताजनक बाब असून ते वाढविण्यासाठी राज्यभर मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

राज्यात १५ जुलैपूर्वी ४ कोटी ६३ लाख २७ हजार २४१ पुरुष आणि ४ कोटी २२ लाख ५७ हजार १९३ महिला तसेच २५२७ तृतीयपंथी असे एकूण ८ कोटी ८५ लाख ८६ हजार ९६१ मतदार होते.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेले महिनाभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १० लाख ७५ हजार ५२८ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने १८-२१ वर्षे वयोगटातील तरुण मतदारांची संख्या अधिक आहे.

राज्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे दर हजारी प्रमाण ९१४ एवढे कमी असून ते वाढविण्याठी राज्यभरात मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ांत पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. तसेच या दोन्ही जिल्हय़ांतील निवडणुका पुढे ढकलण्याची कोणताही आवश्यकता नाही.

मतदान यंत्रे पूर्णत: सुरक्षित

मतदान यंत्रे पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहित असून कोणत्याही बाह्य़ हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदता येणे अशक्य आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्येदेखील या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. मात्र तरीही या यंत्रणेबद्दल काही घटकांकडून अपप्रचार केला जात आहे, ही बाब योग्य नाही त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले.