News Flash

चोरीचा मोबाइल खरेदी करून महापौरांना धमकी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही धमकी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.

दाऊदच्या नावाने धमकावणाऱ्यास मुंब्य्रातून अटक; याआधी पोलीस अधिकाऱ्यांनाही धमक्या

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या डोंगरी भागातून दाऊदच्या नावाने धमकी आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, ही धमकी डोंगरीतून नव्हे तर मुंब्य्रातून आल्याचे तपासात समोर आले असून ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. चोरीचा मोबाइल विकत घेऊन त्याद्वारे त्याने ही धमकी दिली होती.

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी रात्री मोबाइलवरून धमकी आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने डोंगरीतून दाऊदचा माणूस बोलत असल्याचे सांगितले होते. ठाण्यात खूप भांडणे करता आणि व्यवस्थित राहत नाहीत. नीट राहिले नाहीतर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ अशी धमकी त्याने दिली होती. दाऊद तसेच अन्य टोळ्यांकडून खंडणीसाठी धमकीचे फोन येतात. मात्र, पहिल्यांदाच भांडणे करतात म्हणून दाऊद टोळीकडून फोन आल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही धमकी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी महापौर शिंदे यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी खंडणीविरोधी पथकाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने धमकी आलेल्या क्रमांकाच्या आधारे तपास करून वसीम सादीक मुल्ला (२८) याला अटक केली. तो मुंब्य्राचा रहिवासी असून त्याचा दाऊद तसेच अन्य टोळीशी काहीच संबंध नसल्याचे तपासात समोर आले.

वसीम याला अशा प्रकारे धमक्या देण्याची सवय असून त्याने यापूर्वी मुंब्रा पोलीस, नियंत्रण कक्ष, रुग्णालय आणि महापालिकेतील तीन ते चार नगरसेविकांना अशा प्रकारचा त्रास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंब्य्रातील एका घरामधून मोलकरणीने मोबाइल चोरला आणि हा मोबाइल वसीम याने पाचशे रुपयांमध्ये खरेदी केला. याच मोबाइलमधून त्याने महापौर शिंदे यांना धमकी दिली होती. धमकी दिल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून त्याने या मोबाइलचा वापर केला होता. त्याच्याकडे आयफोन-१० सुद्धा आहे. या फोनमध्ये चोरीच्या मोबाइलमधील सिम टाकले होते. त्याच आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली.

धमकी देण्याचे व्यसन?

वसीम हा यापूर्वी दुबईमध्ये कामाला होता. मात्र, वर्षभरापासून तो मुंब्रा परिसरात राहतो. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी असून तो काहीच कामधंदा करीत नव्हता. चोरीचा मोबाइल विकत घ्यायचा आणि इंटरनेटवरून विविध क्रमांक मिळवून त्यांना त्रास द्यायचा, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 2:58 am

Web Title: theft mobile mayor fake call akp 94
Next Stories
1 ठाण्यातील चारही जागांवर शिवसेनेची चाचपणी?
2 आधीच मंदी, त्यात खड्डे!
3 शिक्षणाला विरोध होण्याच्या भीतीने मुलीचे घरातून पलायन
Just Now!
X