मुंबई : राज्याच्या राजकारणावर अधिसत्ता गाजविलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिसऱ्या पिढीकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादीने मतदारसंघ प्रतिष्ठेचे केले आहेत.

शरद पवार यांनी पाच दशके विविध पदे भूषविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती. पवार कुटुंबीयातील दुसऱ्या पिढीतील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद व विविध मंत्रिपदे भूषविली. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष केंद्रित केले होते. सध्या त्या लोकसभेच्या खासदार असून, आधी राज्यसभेचे सदस्यत्वही भूषविले होते. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत.

पवार यांच्या पुतण्याचे पूत्र रोहित पवार हे विधानसभा निवडणूक नगर जिल्ह्य़ातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढवीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या राजकारात उडी घेतली. शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण ते अपयशी ठरले होते. म्हणजेच पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीची ही दुसरी निवडणूक आहे.

आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नेतृत्व प्रस्थापित व्हावे म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे प्रयत्न केले. रोहित पवार हे गेले वर्षभर अनेकदा शरद पवार यांच्याबरोबर दौऱ्यात सहभागी झाले. सहकारी क्षेत्राची त्यांना ओळख व्हावी म्हणून सहकारात त्यांना संधी दिली. रोहित पवार यांची निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा होती. बारामती मतदारसंघ हा अजित पवार यांच्याकडे असल्याने रोहितसाठी नव्या मतदारसंघाचा शोध घेण्यात आला. नगर जिल्ह्य़ातील कर्जत-जामखेड मतदारसंघ या दृष्टीने निवडण्यात आला. गेले वर्षभर रोहित पवार हे या मतदारंसघात संपर्कात होते. पाण्याची समस्या असताना गावागावांमध्ये पाण्याच्या टाक्या वाटल्या. मतदारसंघांतील प्रश्न मांडले.

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघाची निवड करण्यात आली. वरळीत आव्हान देऊ शकतील अशा सचिन अहिर यांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले. वरळीत आदित्य यांची पोस्टर्स झळकू लागली तेव्हाच अंदाज आला होता.

आदित्यासाठी तुलनेत वरळी हा मतदारसंघ सोपा आहे. याउलट रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. शिंदे हे या मतदारंसघातून दोन वेळा निवडून आले आहेत. भाजपची सारी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये मानले जातात. त्यातच पवार कुटुंबियातील सदस्याचा पराभव करण्याकरिता भाजप किंवा मुख्यमंत्री फडणवीस हे सारी ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.

ठाकरे आणि पवार यांच्याबरोबरच शिक्षण महर्षी आणि माजी आमदार डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे. डी वाय पाटील हे विधान परिषदेचे आमदार होते. त्यांचे पूत्र सतेज उर्फ बंटी हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत.  सतेज पाटील यांनी पुतणे रुतूराज पाटील यांना रिंगणात उतरविले आहे.