राज्यातील सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फार काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. सर्वोच्च न्यायालयानं २७ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात दोन धक्कादायक घटना घडल्या. भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं. यामुळे बहुमताचा आकडा असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा दोन ते तीन विक्रमांची त्यांच्या नावावर नोंद झाली.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. याचबरोबर सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचा देखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी.के.सावंत यांच्याकडे आठ दिवसांसाठी मुख्यमंत्रीपद आलं होतं. यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आठ दिवसांचा विक्रम देखील मोडीत काढला. अवघ्या तीन दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. याशिवाय एकाच व्यक्तीने महिनाभराच्या आत दोनदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचाही विक्रम आज फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला.