पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर इथली झाडं तोडण्यात आली होती. त्यानंतर आता मैदानावर चक्क डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक राजकीय पक्षांकडून राज्यातील विविध भागात सभांचा धडाका सुरु आहे. सत्ताधारी भाजपाकडून राज्यात अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत असून उद्या पुण्यात सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी स. प. महाविद्यालयाचे मैदान इथली १५ ते १६ झाडं तोडल्याने चर्चेत राहीले होते. आता या सभेला काही तास शिल्लक राहिले असताना मोदींच्या वाहनांचा ताफा स्टेजपर्यंत जाण्यासाठी आयोजकांनी चक्क मैदानातच ५० फुटी डांबरी रस्ता तयार केला आहे.

मैदानातील या वृक्षतोडीबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. “दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने मैदान परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या होत्या त्यातच आता या मैदानावर सभा होणार आहे. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडून महापालिकेची परवानगी घेऊन, झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.” असे त्या म्हणाल्या होत्या.