पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदींची ही सभा पार पडणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार असून त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं आहे.

एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान आयोजकांनी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असतील. यावेळी परळीत त्यांची पहिली सभा पार पडणार आहे. भाजपा उमेदवार पंकजा मुंडे परळीतून निवडणूक लढत आहेत. यानंतर नरेंद्र मोदी साताऱ्यात जाणार आहे. साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून भाजपाकडून उदयनराजे लढत आहेत. तर विधानसभेसाठी शिवेंद्रराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.

यानंतर नरेंद्र मोदींची संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यात सभा पार पडणार आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. या सभेनंतर नरेंद्र मोदी पुन्हा दिल्लीला रवाना होतील. शुक्रवारी १८ तारखेला मुंबईत सभा घेत नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सांगता करतील.