27 May 2020

News Flash

निवडणूक सेवेतील दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी वगळता कोणत्याही प्रकारच्या घटना आढळून आलेल्या नाहीत

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी झालेल्या हाणामारीच्या घटनांचा अपवाद वगळता विधानसभेसाठी राज्यात सोमवारी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले असून, अंतिम आकडेवारीनुसार यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत अंदाजे ६४.२५ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी वगळता कोणत्याही प्रकारच्या घटना आढळून आलेल्या नाहीत. मात्र मतदानादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात सोमवारी मतदान झाले. औरंगाबाद जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद, जालना जिल्ह्य़ात बदनापूर येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारीच्या घटना वगळता सर्वत्र निर्विघ्नपणे मतदान पार पडले.

राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले मात्र गडचिरोली जिल्ह्य़ामध्ये अहेरी मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बापू पांडू गावडे या पोलीस अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. करवीर कोल्हापूर येथे सर्जेराव भुसे या शिक्षकाचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तर आणखी एका घटनेत नूतन शाळा, रामबाग, ठाणे येथे बंदोबस्तावरील जयराम तरे या पोलिसाला हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना वेळीच इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

विशेष म्हणजे या वेळी मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याच्या तक्रारी कोणत्याही जिल्ह्य़ातून आल्या नाहीत. प्रत्येक वेळी मतदार यादीतून आपले नाव गायब झाल्याच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी मुंबईतील वलयांकित व्यक्ती तसेच पुण्यातील लोकांकडून होत असत. या वेळी मात्र अशी एकही तक्रार आली नसल्याची माहिती सिंह यांनी या वेळी दिली.

कुलाब्यात कमी मतदान

सर्वात कमी मतदानाची टक्केवारी कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४०.२० टक्के झाले. तर उल्हासनगरमध्ये ४१.२० टक्के, कल्याण पश्चिममध्ये ४१.९३ टक्के, अंबरनाथमध्ये ४२.४३ टक्के, वसरेवा ४२.६६ टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२.६८ टक्के मतदान झाले आहे.

मतदानादरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या घटना घडल्या. मात्र नादुरुस्त झालेल्या मशिन्स त्वरित दुरुस्त करण्यात आल्या किंवा बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.

मतदान यंत्र बंद पडल्याबाबत एकूण ३६१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी काँग्रेस पक्षाच्या १५२, शिवसेना ८९ व इतर पक्षांच्या १२० तक्रारी होत्या. या वेळी प्रथमच पुणे जिल्ह्य़ातील  कसबापेठ मतदारसंघामध्ये, पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रथमच बारकोडिंगचा वापर करण्यात आला होता.

ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह

एकीकडे ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असताना मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या शहरी भागात मात्र मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. अनेक जिल्ह्य़ांत  ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यातील पावसाळी वातावरण त्यातच  दुपारपासून मुसळधार पाऊस पडण्याचा वेधशाळेने दिलेला इशारा यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे येण्याची धास्ती होती. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र मतदान पथक वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाले आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले. तसेच अतिवृष्टीमुळे कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ३१ या केंद्रात पाणी शिरल्याने  स्थलांतर करावे लागले.

करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्य़ातील करवीर मतदारसंघात ८३.२० टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी ८०.१९, कागल ८०.१३ टक्के, शिराळा ७६.७८ टक्के तर रत्नागिरी ७५.५९ टक्के मतदान झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 3:59 am

Web Title: two polling officer dies of heart attack during election duty zws 70
Next Stories
1 अल्पसंख्याकांचा चांगला प्रतिसाद
2 निरुत्साह कुणाच्या पथ्यावर?
3 मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांचीही गैरसोय
Just Now!
X