कराड : सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ज्येष्ठनेते शरद पवार हे लढवणार असतील, तर त्यांच्या विरोधात मी उमेदवारी अर्जच भरणार नसल्याचे भावनिक वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांसमोर नोंदवल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंच्या या दिलदार भूमिकेचे तोंड भरून कौतुक केले आहे.

उदयनराजे भोसले यांच्या नव्या भूमिकेमुळे जर सातारा लोकसभा मतदार संघातून शरद पवार अविरोध खासदार होत असतील, तर त्याचा स्वाभाविकपणे आम्हाला आनंदच वाटेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस व आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप श्रेष्ठींच्या उपस्थितीत कमळ चिन्ह हाती घेतल्याने लोकसभेच्या सातारा मतदार संघाची पोटनिवडणूक होत असून, उदयनराजे भाजपचे उमेदवार म्हणून लोकांसमोर आले आहेत.

कालच या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीबरोबर २१ ऑक्टोबरला होत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

प्रारंभी ही पोटनिवडणूक विधानसभेबरोबर जाहीर झाली नव्हती. परंतु, निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घेत विधानसभेबरोबरच सातारा पोटनिवडणुकीची घोषणा केली. दरम्यान, लोकसभेची सातारा पोटनिवडणूक विधानसभेबरोबर झाल्यास आणि न झाल्यास उदयनराजेंना कसा त्याचा फायदा-तोटा होईल याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. या पाश्र्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींना उदयनराजेंची प्रतिक्रिया हवी होती. या वेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी साताऱ्यातून पवार उभे राहिल्यास आपली माघार असल्याचे स्पष्ट करीत पवारांबद्दल आदरभाव व्यक्त केला होता. हाच धागा पकडून शिंदे म्हणाले, की त्यांचा हा आदरभाव कौतुकास्पद आहे.