राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करुन भाजपामध्ये गेलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. पवारांकडून होणाऱ्या टीकेबद्दल उदयनराजेंना प्रश्न विचारला असता ते पवारांच्या आठवणींमध्ये रमले आणि बोलता बोलता भावूक झाले.

भाजपात प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांच्याकडून सतत तुमच्यावर टीका केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते असा प्रश्न उदयनराजे यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला प्रेम आणि आधार दिल्याचे उदयनराजे म्हणाले. ‘पवारसाहेब कालपण आदरणीय होते, आजपण आहे आणि भविष्यकाळातही असतील. मला माझ्या वडिलांनंतर ज्यांनी प्रेम दिलं ते पवार साहेबांनी दिलं. बस्सं, आणखीन काय बोलणार त्यांच्याबद्दल,’ असं उत्तर उद्यनराजे यांनी दिले. पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंचा आवाज जड झाला होता. अनेकदा बोलताना ते अडखळले. मध्येच थांबत त्यांनी आपले अश्रू पुसले. ‘परत तुम्ही म्हणाल कांदाबिंदा धरलाय म्हणून पण डोळ्यातून पाणी आलयं (पवारांबद्दल) बोलताना. पोटनिवडणुकीसाठी ते उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन’, असं उदयनराजेंनी म्हटलं. तसंच ‘पवारांकडून आपण कधीही काहीही मागितलं नाही. मागितलं ते केवळ साताऱ्यातील जनतेसाठी. जनतेची कामं करुन द्या इतकचं माझं मागणं होतं,’ असं उदयनराजेंनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, रविवारी साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले होते. उदयनराजे पक्ष सोडून गेल्यानंतर पवार पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये आले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी “पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच ‘दिल्ली दरबारात झालेला अपमान सहन न झाल्याने तख्त लाथाडून इतिहास घडविणारे व आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवणारे छत्रपती कुठे आणि सत्तेसाठी लाचारी पत्करणारे आत्ताचे त्यांच्या गादीचे वारस कुठे. त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन हे बरं नव्हं,’ अशा शब्दांमध्ये उदयनराजे भोसले यांना टोला लगावला होता.