साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १८ ऑक्टोबर रोजी पाऊस सुरु असतानाच साताऱ्यातील सभेत भाषण सुरु ठेवले अन् ही सभा चांगलीच चर्चेत आली. पाटील यांच्या विजयानंतर पुन्हा या सभेची चर्चा झाल्याचे पहायला मिळाले. या सभेमुळे ‘वारं राष्ट्रवादीच्या बाजूनं फिरलं’ असे मेसेजेस व्हायरल करण्यात आले होते. याच सभेसंदर्भात उदयनराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेच्या निवडणूक प्रचार संपण्यासाठी २४ तासांहून कमी वेळ शिल्लक असताना शुक्रवारी रात्री शरद पवारांनी साताऱ्यामध्ये सभा घेतली. राष्ट्रवादीच्या या सभेमध्ये तुफान पाऊस पडला. शरद पवार भाषण करत असतानाच मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाऊस पडत असतानाही पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. याच सभेमुळे उदयनराजेंचा पराभव झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र आता या सभेमुळे काही परिणाम झाल्याचे मला वाटतं नाही असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं आहे.

मतमोजणीच्या दिवशी निकाल लागल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी ‘शरद पवारांची साताऱ्यामध्ये पावसात एक सभा झाली त्याचा हा परिणाम आहे असं वाटतं का?’ असा सवाल केला. यावर उदयनराजेंनी ‘आय डोन्ट थींक सो’ म्हणजेच मला असं वाटतं नाही असे उत्तर दिले. “पावसाच्या सभांचे असे परिणाम होतं असते तर मी पावसातच हे (प्रचार) केला असता,” असं मत उदयनराजेंनी व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना, ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, वयस्कर आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे तो कमी होणार नाही. तसचं पवारांना ठाऊक आहे की उदयनराजे कधी खोटं बोलत नाही,’ असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> उदयनराजेंच्या पराभवावर शिवेंद्रसिंहराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शनिवारी (१९ ऑक्टोबर) सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. देशभरातील अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवरुन पावसात उभ राहून भाषण देण्याच्या पवारांच्या या राजकारणावरील आणि आपल्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळाले. याच सभेमुळे ‘आमचं ठरलयं.. वारं फिरलयं’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या समर्थकांनी पवारांच्या या सभेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले. याच सभेचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे बोलले जात असून अनेकजण पवारांचा पावसात उभं राहून भाषण देतानाचा व्हिडिओ पाहून भावूक झाल्याचे पाहयला मिळाले.

नक्की वाचा >> उदयनराजेंच्या पराभवावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नक्की वाचा >> ‘कोण आला रे.. कोण आला.. मोदी शहाचा बाप आला’ पवारांबद्दलच्या घोषणेवर सुप्रिया सुळे म्हणतात…

पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर करत आपले मत व्यक्त केलं होतं. या सभेमुळे सर्वांनाच नवी उर्जा मिळाली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. “साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,” असं ट्विट सुप्रिया यांनी केले होते.