काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याचे वृत्त असून, त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कामाला लागल्याचे दिसत आहे. मुंबईतील मालाड परिसरातील हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.  याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे.

दुसरीकडे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर,काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे. दुसरीकडे भाजपाच्या कोअर कमिटीची फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर भाजपा काय निर्णय घेणार आहे, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.