विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत कोणतेही निवेदन करताना ‘अध्यक्ष महोदय’ हा शब्द सातत्याने उच्चारण्याची सवय आहे. ते अनेकांनी अनेक वेळा ऐकलेही आहे. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची फिरकी घेतली.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आपल्या आसनावर सन्मानपूर्वक विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्वागत आणि शुभेच्छांसाठी छोटेखानी भाषण केले. ते म्हणाले, ”अध्यक्ष महोदय, आपण बंडखोर स्वभावाचे, अन्याय सहन न करणारे, आपलं मत मांडताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारे आहात. आपण शेतकरी कुटुंबातून आला आहात. तुम्ही प्रत्येकाला न्याय द्याल, याची मला खात्री आहे. शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद.” हे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की ”अध्यक्ष महोदय असे सातत्याने म्हणायला हवे का? प्रत्येक वाक्याला म्हणायलाच हवे का? तुम्हाला सभागृहाचा मोठा अनुभव आहे. शिवाय तुम्ही आम्ही २५ वर्षे सोबत होतो. ते लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला सांभाळून घ्याल.”

अध्यक्ष महोदय म्हणणे हा आदराचा भाग आहे. ते प्रत्येक वाक्याला म्हणायलाच पाहिजे असे नाही. एकदा सुरूवातील म्हणालात, ते पुरेसे आहे असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करताच, सभागृहात हशा पिकला.

 

भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.