दसरा मेळाव्यात अजित पवारांच्या राजीनामा नाट्याचं उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. “अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुम्ही शेती करणार म्हणालात, पाणी हवं असेल आणि पाणी संपल्यावर धरणापाशी गेलात आणि धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे तुमच्या कर्माने आलेलं आहे. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आम्ही दिलेल्या वचनासाठी वचनबद्ध आहोत. आमचा कारभार प्रभू रामचंद्रांसारखा असेल. जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या ईडी नाट्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. शरद पवार यांनी ईडीसमोर स्वतः हजर होण्याची घोषणा केली. त्यानंतर जे काही घडलं ते आपण पाहिलंच. या महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कुणी करत असेल तर शिवसेना त्यांना माफ करणार नाही. मात्र 2000 मध्ये जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळी बाळासाहेबांच्या बाबतीत तुम्ही काय केलंत? ते जे वागलात ते सूडाचं राजकारण नव्हतं का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मला परवा संजय राऊत यांनी विचारलं की तुमचं टार्गेट शरद पवारच असणार आहेत का? त्यावर मी दिलेलं उत्तर सांगतो की जोपर्यंत त्यांचं टार्गेट आपण आहोत तोपर्यंत माझं टार्गेट तेच असणार आहेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. इतकंच नाही तर जे शस्त्र शिवसेनेला विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेवर उगारलं तेच शस्त्र त्यांच्यावर उलटलं. हे सगळे हिशोब असेच होत असतात. शिवसेना संपवण्याची भाषा सगळ्यांनी केली मात्र ते जमलं कुणालाही नाही. उलट शिवसेनेची ताकद वाढली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.