महायुतीच्या सरकारला घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे शरद पवार आज म्हणत आहेत. भाषणांमधून हे सरकार घालविण्याची भाषा करणाऱ्या पवारांनी जेव्हा पाच वर्षांपूर्वी निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पािठबा का देऊ केला होता? असा प्रश्न उपस्थित करत जिकडे सत्ता तिकडे झुकणारे हे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.

येथील शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली. या वेळी उमेदवार पाटील यांच्यासह खासदार संजय जाधव, आमदार मोहन फड, माजी आमदार मीराताई रेंगे, विजय गव्हाणे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. विवेक नावंदर, सुभाष जावळे, डॉ. सिद्धार्थ भालेराव आदी उपस्थित होते.

सभेत बोलताना ठाकरे म्हणाले,की पवारांच्या वयाबद्दल मला आदरच आहे. पण सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणत आहेत, तर आम्हीसुद्धा त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. भाजप व आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. पण पवार कुठल्या विचाराने भाजपला गेल्यावेळी पाठिंबा देण्याची भाषा करत होते, असा प्रश्न उपस्थित करून गेल्यावेळी युती नसतानाही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार आले,आता तर युती आहे, असे ठाकरे म्हणाले. केंद्रात मोदी सरकार येण्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. आता दहा रुपयात जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी आणि संपूर्ण कर्जमुक्ती शिवसेनेने आपल्या वचननाम्यात जाहीर केली आहे. आम्ही हे केवळ सत्तेसाठी बोलत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसवाल्यांनी गोरगरिबांच्या दोन घासाआड येऊ नये. त्यांना केवळ सत्तेसाठी आपली पोळी भाजायची आहे आणि जनतेला उपाशी ठेवायचे आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपण बाजीप्रभूप्रमाणे लढत असल्याचे  सांगत आहेत. मात्र बाजीप्रभू कोणासाठी लढले आणि हे कोणासाठी लढत आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी बाजीप्रभूंच्या नखाचीही सर यांना येणार नाही, असा टोला लगावला.

वॉटरग्रीडमध्ये परभणी जिल्ह्यचा समावेश करण्यात येईल. सरकार आल्याबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही सुटेल, असे सांगून ठाकरे यांनी परभणी जिल्हा कायम भगव्याच्या पाठीशी राहणारा जिल्हा आहे, असे सांगितले. या वेळी खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यतील महायुतीचे चारही उमेदवार निवडून येतील असा दावा केला.