विधानसभेत बहुमताची चाचणी पास केल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारसमोर आज दुसरी कठीण परीक्षा असणार आहे. कारण, आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून यासाठी महाविकास आघाडीसमोर भाजपाचे आव्हान आहे. नियमांनुसार ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होते. मात्र, महाविकास आघाडीकडून ही निवडणूक खुल्या मतदानाद्वारे घेण्याची मागणी करण्यात येऊ शकते. आज (रविवारी) सकाळी ११ वाजता ही निवडणूक होणार आहे.

विश्वासदर्शक ठरावाप्रमाणेच विधानसभा अध्यक्षांची निवडही खुल्या पद्धतीनं व्हावी, अशी सत्ताधाऱी रणनीती आखत आहेत. यामुळे कोणताही आमदार फुटण्याचा धोकाच उद्भवू नये, याची काळजी घेतली जाणार आहे. शनिवारी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड खुल्या मतदानाने व्हावी अशी मागणी केली होती.

रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्ष सभागृहात निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या पद्धतीने घेण्यात यावी यासाठी प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. यासाठी ते सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाचा हवाला देऊ शकतात ज्यामध्ये कोर्टाने म्हटले होते की, राज्यांमध्ये आमदारांचा घोडेबाजार रोखण्यासाठी विधानसभेत निष्पक्ष वातावरण राखले जावे. जर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी खुल्या मतदानाच्या प्रस्तावाला पाठींबा दिला तर बहुमताच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदान प्रक्रियेद्वारे पार पडेल, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी पटोले विरुद्ध कथोरे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी तर विरोधी पक्ष भाजपाकडून किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. पटोले हे यापूर्वी भाजपाचे खासदार होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्वात आधी बंड पुकारले होते. खासदारांच्या बैठकीत मोदी कोणालाही बालू देत नाहीत, असे आरोप त्यांनी मोदींवर केले होते. तसेच मोदींवर हुकुमशाह असल्याचा आरोप करीत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाचे सदस्यत्वही सोडले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तर दुसरीकडे भाजपाने मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार म्हणून निवडले आहे. कथोरे यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, दोनदा ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४मध्ये ते भाजपात दाखल झाले होते.