शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी अजिबात तयार नव्हते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.

“मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे अनुकूल नव्हते. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार असा शब्द मी बाळासाहेबांना दिलाय अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे सरकार चालवण्यासाठी एकवाक्यता ही उद्धव ठाकरे यांच्या नावावर होऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी आमची भूमिका होती. उद्धव ठाकरे ते पद स्वीकारण्यासाठी तयार होत नव्हते. पण हा माझा आदेश आहे असे सांगितल्यावर ते तयार झाले” असे शरद पवार म्हणाले.

“राज्याचा कारभार चालवण्यासाठी आम्ही त्यांना किमान समान कार्यक्रम दिला आहे. मुख्यमंत्र्यांवर रिमोट कंट्रोल ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. उलट त्यांना मदत केली पाहिजे. सल्ला मागितला तर सहकार्य केलं पाहिजे तीच आमची भावना आहे” असे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीची मोट कशी बांधली. भिन्न विचारधारेच्या पक्षांना कसे एकत्र आणले ते शरद पवार यांनी आज उलगडले.