उद्धव ठाकरे यांचा सुशीलकुमारांना सवाल

श्रीरामपूर : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे खरे बोलले. दोन्ही काँग्रेसचे नेते खचले आहेत. त्यांना भवितव्य उरलेले नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला पळाले. मग निवडणूक कशाला लढता, असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे व संगमनेर येथे साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी बुधवारी ठाकरे यांच्या सभा झाल्या.

कार्याध्यक्ष ठाकरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. एक चांगला माणूस आहे. सदा हसतमुख आहेत. ते कधी खोटं बोलत नाहीत. ते खरे बोलले. दोन्ही काँग्रेसचे नेते खचलेले आहेत हे त्यांनी मान्य केले. पुरेसे संख्याबळ त्यांना निवडून आणता येणार नाही. ज्यांना भविष्य नाही अशांच्या हातात सत्ता कशी देणार, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी खाऊन खाऊन थकले. त्यांचे नेतेच बेकार झाले. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर शरद पवारांना विदेशी सोनिया चालतील का? दोन्ही पक्षांचा नेता कोण असेल, हे आधी स्पष्ट करावे. दोन्ही काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. आता रडणारी माणसे त्यांच्याकडे राहिली आहेत; पण शिवसेनेला लढणारी माणसे हवी आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून लढणारा शिवसैनिक आहे. साठ वर्षे देश हातात असताना काही केले नाही. आता ते काय करणार, असा सवालही ठाकरे यांनी केला.

वर्षांला १० हजार रुपये देण्याचे आश्वासन

राज्य सरकारच्या कर्जमाफीवर आपण समाधानी नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणारच; पण दरवर्षी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याची योजना तयार आहे, असे सेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांनी सभेत आश्वासन दिले.