X
X

‘उदयनराजे मोदींना काय बोलले होते? त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडून आणले?’; उद्धव यांचा खोचक सवाल

"साताऱ्याची जागा जी शिवसेनेच्या वाट्याची होती ती माझ्याशी चर्चा न करता भाजपाने घेतली"

विधानसभेच्या निकालांनतर १४ दिवसांनीही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी युतीमधील गुंतागुंत आणखीन वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेबद्दलची नाराजी स्पष्ट शब्दांमध्ये मांडत ‘शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली जाणारी टीका सहन केली जणार नाही,’ असं मत व्यक्त केलं. या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळेस आम्ही मोदींवर कधी टीका केली नाही त्यांच्या कार्यपद्धतीवर केली असं उद्धव यांनी सांगताना उदयनराजेंचे उदाहरण दिले.

‘लोकसभेच्या निकालानंतर राज्यामध्ये २०० ते २२० जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे अपेक्षित यश भाजपाला मिळाले नाही. स्ट्राइकरेटचं काय बोलायचं. चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाच्या वेळेस १४४ जागा घेताना आम्हाला समजून घ्या असं म्हटलं होतं. मी तेव्हा अडचण समजून घेतली ही माझी चूक झाली का?,’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ‘जागावाटपाच्या वेळी मी भाजपाने दिलेल्या १२४ जागा मी स्वीकारल्या. ज्या भाजपा देईल त्या जागा स्वीकारल्या. त्यांनी फोडाफोडी करुन ज्या जागा त्यांनी घेतल्या त्याही स्वीकारल्या. साताऱ्याची जागा जी शिवसेनेच्या वाट्याची होती ती माझ्याशी चर्चा न करता भाजपाने घेतली. उदयनराजेंना फोडून तुम्ही स्वत:च्या पक्षात घेतलं. मोदींजींवर आम्ही टीका केल्याचं सांगता. पण ज्या उदयनराजेंना तुम्ही घेतलं, ज्या उदयनराजेंनी मोदींच्या डोक्यावर पगडी ठेवली ते उदयनराजे मोदींना काय बोलले होते? आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडून आणले? हे सर्व तुम्हाला चालतं का?’ असा सवाल उद्धव यांनी भाजपाला विचारला.

तेव्हा काय म्हणाले होते उदयनराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ‘मला पन्नास दिवस द्या. पन्नास दिवसात सर्व काही पूर्वव्रत होईल,’ असं एका भाषणामध्ये म्हटलं होतं. याचवेळी कराडमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे यांनी यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंनी मोदींवर टीका केली होती. ‘अरे क्या पचास दिन दो. इथे शेतकऱ्यांना खायला अन्न नाही. शेतकऱ्यांची वाट लागलीय. शेतीमाल सडत पडलाय आणि पंतप्रधान म्हणतात पचास दिन रुको. अरे कोण थांबणार आहे. मोठं काही झालं तर जाळपोळ सुरु होईल. थांबवणार कोण हे सगळं? असं झालं तर या सर्वाला मोदी सरकार आणि त्यांचं शासन जबाबदार असेल,’ अशी टीका उदयनराजे यांनी केली होती. पुढे बोलताना त्यांनी मोदींवर टिका करताना, ‘माझे अनेक मित्र भाजपामध्ये आहेत. भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार मूग गिळून का गप्प आहेत? तुम्ही बोलायला घाबरता कशाला असा सवाल केल्यावर ते म्हणतात अरे वो मोदी असं म्हणतात. अरे मोदी हैं तो क्या? आमच्या इथं साताऱ्याला मोदी पेढेवाले आहेत,’ असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

Video: ‘मोदी पेढेवाले’ ते ‘मोदी पोलाद पुरुष’… उदयनराजे भोसलेंचा प्रवास

याच व्हि़डिओमध्ये उदयनराजेंनी मोदींवर सडकून टीका केल्याचे दिसते. ‘हा मोदी एवढा मोठा कोण लागून गेला?’ असा सवाल उद्यनराजेंनी उपस्थित करत नोटबंदीनंतरच्या परिस्थितीवर आपला राग व्यक्त केला होता. ‘मला मोदींना एक सांगावसं वाटतं. समाजामुळे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्यामुळं किंवा एकट्या कुठल्या व्यक्तीमुळे समाज नाहीय हे लक्षात घ्या. माझ्या मते (नोटबंदीचा निर्णय) हा पूर्णपणे मोदींचा मुर्खपणा आहे. या देशात लोकशाही आहे हे त्यांना कळत नाही. या देशात हुकूमशाही चालत नाही. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो व्यवस्थित चर्चा करुन घेतला पाहिजे,’ असं उद्यनराजे यावेळी म्हणाले होते. काळ्या पैश्यावर कारवाई करण्यासाठी नोटबंदी केल्याचा सरकारच्या दाव्यावरही उदयनराजेंनी टीका केली होती. ‘यांना माहिती नाही काळा पैसा कोणाकडे आहे. यांच्याकडे आयबी आहे, ईडी आहे इतकचं नाही रॉ, सीबीआय आणि आरबीआय सारख्या संस्थाही आहेत तरी भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात आली नाही. एवढ्या सगळ्या संस्था असताना ज्या फाईल पेंडींग पडून आहेत त्यांच्यावर सरकारने का कारवाई केली नाही? थोडा कर कमी केला असता तर लोकांनी स्वत:हून दंड भरला असता,’ असं मत उदयनराजेंनी नोंदवलं होतं. तसेच मुठभर लोकांनी भ्रष्टाचार केला तर संपूर्ण देशाला मोदी सरकारने नोटबंदी कारुन का वेठीस धरले आहे असा सवालही उद्यनराजेंनी उपस्थित केला होता. ‘या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला फार मोठ्याप्रमाणात धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही क्षणी लोकांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो. वणाव पेटल्यानंतर तो कोणी थांबू शकत नाही तशी परिस्थिती निर्माण होईल. देशात जंगलराज येईल. काही मिळालं नाही तर लोकं बँकेत जाऊन बँका लुटतील,’ अशी भितीही उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली होती.

तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नोटबंदीचा संदर्भ देत मोदींनीच खोटे दावे केल्याची टीका केली. “मला पन्नास दिवस द्या असं सांगत खोटं कोण बोललं होतं हे सर्व देशाला ठाऊक आहे,” असा टोला उद्धव यांनी लगावला होता.

21
Just Now!
X