राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवान नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शनिवारी सकाळी शपथ घेतल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर महाविकास आघाडीने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपआपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची  बैठक घेतली,  विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती.  या बैठकीस मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना  आपल्याकडे संख्याबळ आहे, आपण निश्चित  बहुमत सिद्ध करू असे सांगितले. तसेच,  काळजी करू नका, आपली युती बरीच पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी या बैठकीसंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीस मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थितीत होते. आपल्याकडे बहुमत आहे, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी आमदारांना दिला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयचा उद्या निकाल आहे, त्यानुसार पुढे काय करायचे हे ठरवले जाणार आहे. पण जर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आलीच तर निश्चितपणे संख्याबळ आपल्याबाजूने आहे. त्यामुळे आपण नवीन सरकार स्थापन करू असे बैठकीत सांगण्यात आले असल्याचेही आमदार मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एकीकडे या घडामोडी घडत असताना, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांच्या या ट्विटला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. “भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांनी केलेलं विधान खोटं असून दिशाभूल करणारं आहे. संभ्रम निर्माण करण्यासाठी खोट्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.