शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर शरद पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. शरद पवारांनी यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या.

“बाळासाहेब आज असते तर त्यांना आनंद झाला असता. बाळासाहेबांनी लहान कार्यकर्त्यांना मोठं केलं” हे सांगताना त्यांनी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे उदहारण दिले.

“चंद्रकांत खैरे यांचा जन्म ज्या समाजात झाला त्याची लोकसंख्या अवघी दोन ते तीन हजार होती. पण बाळासाहेबांनी हा विचार न करता चंद्रकांत खैरे यांना विधानसभेवर, लोकसभेवर पाठवले. बाळासाहेबांनी असे अनेक खैरे घडवले. अशी किमया तेच करु शकतात” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.