पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधणार, आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार असून त्यानंतर आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार असल्याचे समजते.

शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये संभ्रम वाढला आहे. त्यातच शरद पवार यांच्या विधानांमुळे आणि भाजपच्या सरकार स्थापनेबाबतच्या दाव्यांमुळे नेमके काय घडत आहे यावरून आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही आमदारांनी ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधत राष्ट्रवादीवर विश्वास ठेवता येईल का याबाबत शंका उपस्थित केली. तर चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व आमदारांची बैठक शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता बोलावली आहे. त्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटीची सद्य:स्थिती व शिवसेनेच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे बोलतील. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेत जातील, असे सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना राजस्थानला हलवण्यात येणार आहे. सत्तास्थापनेचा तिढा शनिवार वा फार तर सोमवापर्यंत सुटायला हवा, या निष्कर्षांप्रत शिवसेना आली आहे. त्यामुळे राज्यपालांकडे दावा दाखल करणे व राज्यपालांकडून आमंत्रण येईपर्यंत आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे. भाजपकडून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

‘सत्ता स्थापनेबाबत  योग्य वेळी बोलू’

ठाणे : राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात योग्य वेळ आल्यावरच बोलेन, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी अधिक बोलणे टाळले.

ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या चारही नेत्यांनी एकाच वेळी उपस्थिती लावल्याने शहरात महाविकास आघाडीची चर्चा रंगली होती. या चारही नेत्यांमध्ये महापौर कार्यालयात बराच वेळ चर्चा सुरू होती. ठाण्याचा विकास झाला पाहिजे, यासाठीच सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मात्र ही महाविकास आघाडी नाही. महापौर नरेश म्हस्के यांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेत आलो असून राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड हे सुद्धा त्यासाठीच आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आव्हाड यांची भेट राजकीय नव्हती तर केवळ महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी होती, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एकमेकांशी चर्चा सुरू असून लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल, असा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता हा आमच्या पक्षाचा असणार आहे. त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडी नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

वरिष्ठ नेत्यांची सायंकाळी चर्चा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत शुक्रवारी सकाळी सहकारी पक्षांच्या नेत्यांसह बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.