महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटतो आहे असंच चित्र आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज नेहरु सेंटरमध्ये पार पडलेली तिन्ही पक्षांची बैठक. या बैठकीत अनेक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अहमद पटेल यांची उपस्थिती होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावं हा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली पसंतीही उद्धव ठाकरेंच्याच नावाला होती. काँग्रेस नेतेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी हा दावा केल्याने उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे संजय राऊत यांनी आत्तापर्यंत दररोज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे स्पष्ट झालेलं नव्हतं. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत अशी चार नावं शिवसेनेकडून चर्चेत होती. मात्र अखेर उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील यात काहीही शंका नाही.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. ‘आत्ता माझ्याकडे सांगण्यासारखं नाही. अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की एकही गोष्ट अनुत्तरीत ठेवायची नाही. अनेक मुद्द्यांवर वर एकमत झालं आहे. थोडे फार बारकावे बाकी आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. म्हणून आत्ता बोलणार नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती. दरम्यान संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याचं स्पष्ट केलं.