राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरादर सुरू आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. महायुती व महाआघाडीचे नेते प्रचारात सक्रीय झाले असून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिग्गज नेते सभांद्वारे विरोधकांवर गंभीर आरोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपा सरकारवर टीका करत, हवाई दलाच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभासाठी वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. पवार सध्या दोन दिवसीय विर्दभ दौऱ्यावर असून यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ इतिहास रचला नाही, तर भूगोलही बदलला. मात्र, त्यांनी याचा कधीही राजकीय लाभासाठी वापर केला नाही. दुर्देवाने सध्या पुलवामा आणि उरीतील सैन्याच्या अतुलनीय कार्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभ मिळवण्यासाठी गैरवापर केला जात आहे. असा वापर करणं भारतीय सैन्यावर अविश्‍वास दाखवल्यासारखं होईल. तसेच, सीबीआय, ईडी सारख्या संस्थांचा सत्ताधार्‍यांकडून पुरेपूर गैरवापर केला जात आहे व सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला. सत्तेचा गैरवापर किती करायचा यांची मर्यादा सत्ताधाऱ्यांना राहिलेली नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षातील कार्यकाळाबाबत टीका केली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, राज्यातील कारखानदारी बंद होत आहे, विकास दर खालवत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना सत्ताधाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्याची कुवत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील शेतीची स्थिती, बेरोजगारी, कारखानदारी, महागाई, महिलावरील अत्याचार या गंभीर प्रश्‍नांवर सत्ताधारी बोलत नाहीत. ते केवळ गुजरातकडून येणार्‍या सूचनांचेच पालन करतात. त्यांचा अधिक वेळ विरोधकांना शिव्या-शाप देण्यातच जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात किती कारखाने बंद पडले, किती रोजगार गेले, किती आत्महत्या झाल्या याची आकडेवारी पाहिली तर फडणवीसांचे कतृत्व दिसेल.

विदर्भात केवळ नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामंच दिसत आहेत. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केलेले दिसत नसल्याचे सांगत, राज्य आणि देशाला संकटात नेणार्‍यांना सत्ताधार्‍यांना खाली खेचा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.