News Flash

वेध विधानसभेचा : बालेकिल्ल्यात ‘वंचित’ची जादू चालणार?

अकोला जिल्हय़ात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. चार ठिकाणी भाजप, तर एक जागा भारिप-बमसंकडे आहे

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

लोकसभा निवडणुकीत अकोल्यात विक्रमी मताधिक्यासह विजयी चौकार लावणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकीत यशाचा आलेख कायम राखण्याचे लक्ष्य  ठेवले आहे. भाजप-शिवसेना युतीत जागा वाटपाचा पेच असून, २००४ नंतर एकही जागा जिंकू न शकणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्य़ात वंचित कशी आणि किती लढत देते यावरही बरीच गणिते अवलंबून असतील.

अकोला जिल्हय़ात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. चार ठिकाणी भाजप, तर एक जागा भारिप-बमसंकडे आहे. दहा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी भोपळाही फोडू शकली नाही. प्रमुख पक्षांनी युती व आघाडी करून निवडणुका लढण्याचा सावध पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर आघाडीसंदर्भात काय निर्णय घेतात, यावर जिल्हय़ातील समीकरणे अवलंबून राहतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत जिल्हय़ात भारिप-बमसं मजबूत आहे. वंचितसोबत आघाडी न झाल्यास अनेक मतदारसंघात युती विरुद्ध वंचित अशी लढत होईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवले. सर्वच मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांना मताधिक्य आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. केवळ नेत्यांची अंतर्गत गटबाजी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. ‘आमचं ठरलंय’ असे म्हटले जात असले तरी युतीत जागा वाटपावरून तेढ निर्माण होण्याचा अंदाज आहे. युतीमध्ये परंपरागत शिवसेनेकडे असलेले अकोला पूर्व व अकोटमध्ये भाजपने भगवा झेंडा फडकवला. आमदार असताना भाजप हे मतदारसंघ सोडणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. पाचपैकी किमान दोन जागा शिवसेनेला द्याव्या लागतील.

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड असून, भाजपचे गोवर्धन शर्मा २५ वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. सलग सहाव्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरतील. त्यांच्या वयाचा मुद्दा समोर येऊ शकतो. तळागाळातील जनसंपर्क, उड्डाणपुलासारखी निर्माणाधीन विकासकामे त्यांची जमेची बाजू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते. गठ्ठा मतदान लक्षात घेता येथून मुस्लीम उमेदवार देण्याचा मतप्रवाह आघाडीत आहे. वंचित कुणाला उमेदवारी देतो, यावरही गणिते अवलंबून राहतील.

पूर्वीचा बोरगांव व पूनर्रचनेनंतर शहरी आणि ग्रामीण मिश्र अकोला पूर्व मतदारसंघ भाजपसाठी पोषक समजला जात आहे. युतीमध्ये परंपरागत शिवसेना लढत असली तरी यावेळेस ते उत्सुक नसून भाजपलाच बळ पुरवतील. गतवेळी भाजपकडून ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरलेले रणधीर सावरकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत विकासकामांच्या भरवशावर जनाधार मजबूत केला. लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांना अकोला पूर्वमधून मोठे मताधिक्य मिळाले. याठिकाणी भाजपसमोर वंचित आघाडीचे आव्हान असेल.

२०१४ मध्ये बाळापूर मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणामुळे भाजपला पराभवाचा धक्का बसला, तर भारिप-बमसंने जागा कायम राखली. मतदारसंघात मोठा वाद व अंतर्गत कुरघोडीचे राजकारण रंगते. बाळापुरातून लढण्यासाठी शिवसेना, शिवसंग्राम व भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. भाजपचा विद्यमान आमदार नसल्याने युतीत ही जागा शिवसेनेसाठी सोडण्याची अधिक शक्यता आहे. बाळापूर भाजपांतर्गत वादाचे मोठे कारण ठरू शकत असल्याने शिवसेनेसाठी सुटल्यास ‘सुंठे वाचून खोकला गेला’, अशी भावना भाजप नेत्यांची असेल. आघाडीकडून जुनेच नेते नव्याने तयारी करीत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात दशकभरापासून पकड असलेल्या भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात आघाडी व वंचितमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. शिवसेनेकडूनही काहींनी तयारी सुरू केली. मूर्तिजापूरमध्ये लोकसभेत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. संघटन व विकासकामांच्या आधारावर पिंपळेंची पुन्हा तयारी सुरू आहे. अकोट कायम राखण्याचे प्रकाश भारसाकळेंपुढे आव्हान आहे. अकोला-अकोट मार्गाच्या चौपदरीकरणाची कासवगती व इतरही कारणांवरून त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आहे. युतीमध्ये अकोट शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ, शिवाय त्या ठिकाणी लढण्यासाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. भारसाकळे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. अकोट शिवसेनेसाठी सुटल्यास निवडणुकीच्या तोंडावर मोठा उलटफेर होऊ शकतो. नेहमी परिवर्तन घडणाऱ्या अकोटमध्ये काँग्रेस व वंचितमध्येही इच्छुकांची रीघ लागली आहे.

विधानसभेपूर्वी जिल्हय़ात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी सराव सामना ठरणार आहे. त्या निवडणुकीत समोर आलेल्या उणिवा भरून काढण्याची संधी सर्वच पक्षांकडे असेल. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात निर्विवाद वर्चस्व कायम राखण्यात भाजपची कसरत आहे, तर आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई राहील.

अकोला जिल्हा

असे आहे पक्षीय बलाबल

* अकोला पश्चिम – भाजप

* अकोला पूर्व    – भाजप

* मूर्तिजापूर – भाजप

* अकोट   – भाजप

* बाळापूर  – भारिप-बमसं

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्यासाठी जिल्हय़ात भाजपची संपूर्ण तयारी आहे. संघटनेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत योजनांची माहिती तळागाळात पोहोचविण्यात येत आहे. शिवसेनेसोबतच्या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.

– तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप

काँग्रेसकडून विचारपूर्वक निर्णय घेऊन उमेदवार देण्यात येतील. सामाजिक समतोल साधत निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी देण्यात येईल. राष्ट्रवादीने दोन जागा मागितल्या आहेत. अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील.

– डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:23 am

Web Title: vanchit bahujan aghadi affect in akola abn 97
Next Stories
1 गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस घेणार ‘या’ नव्या प्रणालीची मदत
2 बदलापूर : अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रशासनाचे आवाहन
3 “पक्षाने कायम गणेश नाईकांना वरची बाजू दिली”, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली खंत
Just Now!
X