वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नसून ते कारखान्यांचे मालक असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय बौद्ध महासभेच्या अकोला जिल्हा शाखेने ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत. ते काखानदारांचे मालक आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी कोणत्याही प्रकारचं घेणं-देणं नाही. केवळ शेतकऱ्यांची लूट कशी करता येईल हे ते पाहत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, आंबेडकर यांनी या निवडणुकीत मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असं आवाहन केलं आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. परंतु त्याला पाणी पाजता येत नाही. लुटणाऱ्या नेत्यांना ओळखून निवडणुकीत मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा असंही ते यावेळी म्हणाले.