गेल्या निवडणुकीपर्यंत वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा लावून धरल्याने भाजप मजबूत झाला. परंतु सत्तेत येताच विदर्भाचा त्यांना विसर पडला. काँग्रेस अजूनही तळागाळात जिवंत असून, विदर्भाची चळवळ हाती घेतल्यास काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केला. शहर काँग्रेसने अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचा कार्यकर्त्यांसोबत संवाद कार्यक्रम देवडिया काँग्रेस भवनात रविवारी आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी, संदेश सिंगलकर उपस्थित होते. अ‍ॅड. अणे यांनी प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि लोकनायक बापूजी अणे यांचा दुर्मिळ तैलचित्र शहर काँग्रेसला भेट दिले.

आजच्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात फक्त विदर्भामध्येच काँग्रेस तळागाळात जिवंत आहे. येथील कार्यकर्ता प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या सांगण्यावरून विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडे पक्षश्रेष्ठी लक्ष देत नाही.

सद्यस्थितीत काँग्रेसला संजीवनी विदर्भातूनच प्राप्त होऊ शकते. याकरिता विदर्भ प्रदेश काँग्रेस स्थापन करण्यास पक्षाला भाग पाडावे. तसेच भाजपने ज्याप्रमाणे विदर्भातील प्रश्न लावून धरले आणि विदर्भाचा मुद्दा हाती घेतला. त्याप्रमाणे विदर्भाची चळवळ काँग्रेसने उभी करावी, असेही ते म्हणाले.

विकास ठाकरे म्हणाले, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासाठी परिश्रम करतात. जाहीर सभांना गर्दी जमवण्याचे काम देखील ते करतात. परंतु व्यासपीठावर बसणाऱ्यांची नावे दिल्लीतून निश्चित होतात. असेच सुरू राहिल्यास पक्ष मजबूत कसा होईल. दिल्लीत जाऊन चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी न देता, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसची खरी ताकद कळेल, असे सांगून स्वतंत्र्य विदर्भाच्या बाजूने आम्ही आहोत, असे ठाकरे म्हणाले. संचालन सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार यांनी केले. सरचिटणीस दयाल जशनानी यांनी आभार मानले.

देवडिया भवनात वेगळ्या विदर्भाच्या घोषणा

विदर्भाच्या मुद्यांवरून महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणारे अ‍ॅड. श्रीहरी अणे हे रविवारी काँग्रेसच्या शहर कार्यालयात होते. त्यांच्या आगमानाने आज खूप दिवसांनी देवडिया भवनात वेगळ्या विदर्भाच्या घोषणा समर्थकांकडून देण्यात आल्या.