विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न केले जात आहे. यासाठीच मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र विचारसरणीच्या दृष्टीने दोन टोकाचे पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मध्यस्थी करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. तसेच या तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आल्यास शरद पवारांवर या आगळ्यावेगळ्या युतीची मोट बांधून सरकार चालवणे ही जणू तारेवरची कसरत असणार आहे. असं असलं तरी या तीन्ही पक्षांचे एकत्रित सरकार सत्तेत आल्यास पवारांचीच पॉवर राज्यामध्ये दिसून येणार आहे. जाणून घ्या कशाप्रकारे या सरकारमध्ये पवारांची भूमिका महत्वाची असणार आहे.

दरम्यान, हे सरकार निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत असले तरी याबद्दलचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.